पुणे : पुणे शहरअंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या ७२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा आज (दि. ११) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या ७ नवीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन, पोलीस आयुक्तालयात २००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, पोलीस आयुक्तालयाच्या व बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची उभारणी इत्यादी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शहरात वाहतूक खूप वाढली आहे. यामध्ये अधिकारी वाढवायचा निर्णय घेतला आहे. एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त देणार आहोत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपयोग होईल. तसेच आजच आपण सायबर सेंटर सुरू करत आहोत. साडे सातशे कोटी रुपये खर्च करून उभा केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, मागच्या काळात आपण गुगलसोबत एक करार केला आहे. त्यामध्ये आता एआय उपयोग कसा करायचा, याचं काम पण सोपं आहे. ट्रॅफिकसाठी याचा उपयोग होणार असून त्यात सगळं शक्य आहे. ड्रोनचा वापरही केला जाणार आहे. तसेच देशात नवीन तीन कायदे आणले आहेत. पोलीस यांच्यावर जास्त जबाबदारी टाकली आहे. 2014 नंतर आपण निर्णय घेतल की, टेक्निकल पुरावे आपण गोळा करून गुन्हे सिद्ध करण्यास मदत होत आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील एक आरोपी अटक : देवेंद्र फडणवीस
पुणे पोलिसांनी बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून इतर दोन आरोपींची माहिती मिळाली आहे. ते देखील लवकरच सापडतील. प्राथमिक चौकशीत हे आरोपी अतिशय सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मला दिली. या आरोपींनी कुठलाही डिजिटल पुरावा मागे राहू नये याची काळजी घेतली होती. मात्र, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात टिम्स तयार केल्या होत्या. जवळपास सातशे पोलीस आरोपींचा शोध घेत होते. तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. या गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.