पुणे : शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला पोलिसांनी मंगळवारी (दि. १२) येरवडा परिसरात अटक केली. त्याच्याकडून एक धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. अभय चंद्रकांत जंगले (वय २१, रा. येरवडा) हे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस शिपाई अनिल शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. जंगले याच्याविरुद्ध सशस्त्र हाणामाऱ्यांचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला १६ मार्च २०२३ ला पुणे शहर, पिंपरी, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. या आदेशाचा आदेशाचा भंग करून तो येरवडा परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने वाडिया बंगल्याजवळ त्याला सापळा लावून पकडले. त्याच्या झडतीमध्ये एक धारदार कोयता आढळला.