पुणे : गुन्ह्यातून सहिसलामत सोडविण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून, त्यापैकी १ लाख ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. तरीही लालच न संपणाऱ्या वकीलाला पुन्हा २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोथरूड येथील वनाझ कॉर्नरजवळून मंगळवारी (ता. ९) रंगेहाथ पकडले.
सुमित नामदेवराव गायकवाड (वय-२५, व्यवसाय- वकील, रा. सेवागिरी निवास, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वकीलाचे नाव आहे. या प्रकरणी एका २५ वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या दोन्ही मित्रांना पोलीस कोथरूड पोलीस ठाण्यात घेवून गेले होते. त्यामुळे तक्रारदार त्यांच्या मित्राच्या ओळखीचे वकील सुमित गायकवाड यांना भेटण्यासाठी गेल्या. तेव्हा गायकवाड यांनी तक्रारदार यांच्यावर व दोन्ही मित्रांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांसोबत तडजोड करतो, असे सांगून ५ लाख रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी वकील सुमित गायकवाड यांना १ लाख रुपये व फोन पे द्वारे ५५ हजार रुपये असे १ लाख ५५ हजार रुपये दिले. मात्र, गायकवाड यांनी उर्वरित रक्कम देत नाही तोपर्यंत तक्रारदाराविरुद्ध असलेला पुरावा मी नष्ट करणार नाही, असे सांगून अजून ३ लाख ५५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, वकील सुमित गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मित्राला कोथरुड पोलिसांकडून सोडविण्यासाठी तसेच तकारदार यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी पंचांसमक्ष साडेतीन लाखांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या लाचेतील २० हजार रुपये फोन पेद्वारे स्वीकारताना गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
ही कामगिरी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, पोलीस उप अधीक्षक नितिन जाधव, पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकअतुल भोसले, सहाय्यक फौजदार मुकुंद अयाचित, शिल्पा तुपे, वनिता गोरे, अविनाश चव्हाण, दीपक काकडे यांच्या पथकाने केली आहे.