सागर जगदाळे
भिगवण : बारामती-भिगवण शटल भिगवण बस स्थानकापर्यंत येत नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या शटल बस स्थानकापर्यंत येण्यासाठी भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रा. तुषार क्षीरसागर व जावेद शेख यांनी बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.
भिगवणवरून बारामतीला प्रवास करणाऱ्यांमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नोकरदार वर्ग, महिला यांचीही संख्या जास्त आहे. परंतु बारामती-भिगवण शटल भिगवणमध्ये बस स्थानकापर्यंत येत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना मदनवाडी-चौफुला किंवा तक्रारवाडी येथे सुमारे एक ते दोन किलोमीटर पायी चालत जावे लागते. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत विद्यार्थी, नागरिक, महिला तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी निवेदन देण्यात आले असून, सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे जावेद शेख यांनी सांगितले.
प्रवाशांना बस सेवा देणे ही आमची जबाबदारी
प्रवाशांना योग्य बस सेवा देणे आमची जबाबदारी आहे. भिगवण दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, बारामती-भिगवण शटल भिगवण बसस्थानकापर्यंत येण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
– वृषाली तांबे, आगार व्यवस्थापक, बारामती