जेजुरी: पुणे ते कोल्हापूर या महत्त्वपूर्ण लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकात हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची अति जलद रेल्वे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात अल्पवेळ थांबेल. तर, सध्या कोल्हापूर ते पुणे धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून मुंबईपर्यंत धावणार आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे विभाग व्यवस्थापक धर्मवीर मीना, पुणे विभाग व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, पुणे आरपीएफच्या प्रियंका शर्मा यांनी जेजुरीतील माज नगरसेविका अमिना पानसरे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे, उद्योजक राजू पानसरे व ग्रामस्थांना दिली.
पुणे-कोल्हापुर लोहमार्गावरील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ११ मार्च) आळंदी (महातोबाची) या रेल्वे स्थानकाला भेट दिली. जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण औद्योगिक वसाहतीचे महत्त्वपूर्ण शहर आहे. रेल्वे स्थानकापासून केवळ १४ कि.मी. अंतरावर अष्टविनायकातील पहिले स्थान मोरगाव आहे. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, गुजरात येथून भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात येतात. या मार्गावरून वंदे भारत, दिल्ली-गोवा, जोधपूर-मंगळुरू, कोल्हापूर-अहमदाबाद, महालक्ष्मी, लोकमान्यनगर-हुबळी, यशवंतपूर-हुबळी अशा अनेक लांब पल्ल्याच्या अतिजलद रेल्वेगाड्या धावतात. मात्र, जेजुरीत थांबा नसल्याने भाविक-भक्त व औद्योगिक वसाहतीमधील कामगारवर्गाची गैरसोय होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी येथील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते करत आहेत. अखेर रेल्वे प्रशासनाने मागणी मान्य करीत पुढील महिन्यापासून दिल्ली-गोवा एक्स्प्रेस जेजुरीत थांबणार असून, सध्या सुरू असलेली कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.