उरुळी कांचन (पुणे) : अंडाभूर्जीचे पैसे मागितले म्हणून पाच जणांच्या टोळक्यांने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकातील अंडाबुर्जीच्या टपरी चालकाला कोयता व लाकडी दांड्याच्या सहाय्याने मारहाण करून, टपरी चालकाच्या गल्ल्यातील सत्ताविशे रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता. 23) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
अंडाबुर्जीच्या टपरी चालकाला कोयता व लाकडी दांड्याच्या सहाय्याने पाच जणांनी मारहाण करणे, गल्ल्यातील रक्कम काढुन घेणे, मारहाण करणारे गुन्हेगार रेकॉर्डवरील असणे या बाबी गंभीर असतानाही, उरुळी कांचन पोलिसांनी मात्र पहिले आरोपी शोधू, मगच गुन्हा दाखल करु, असे म्हणत तब्बल पंधरा तासांहून अधिक काळ वरील गंभीर प्रकरणाचा गुन्हा दाखल केला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची भेट घेतल्यानंतर, उरुळी कांचन पोलिसांनी तब्बल पंधरा तासांच्या दिरगांईनंतर गुन्हा दाखल करुन घेतला. मात्र, पंधरा तासांच्या दिरगांईनंतर गुन्हा दाखल करतानाही, उरुळी कांचन पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने पाच ऐवजी तीनच आरोपी गुन्ह्यात सहभागी असल्याचा ‘एफआयआर’मध्ये उल्लेख केल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मण उर्फ लखन धोंडीबा ढवळे यांनी केला आहे.
लक्ष्मण उर्फ लखन धोंडीबा ढवळे (वय-37, धंदा, अंडाभुर्जी टपरी, रा. तळवडी चौक, काळेवाडा, उरुळी कांचन ता. हवेली) हे मारहाण झालेल्या तळवडी चौकातील अंडाबुर्जीच्या टपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी धिरज नागटिळे, सैलानी शेख व अदित्य मानकर (पुर्ण नावे माहीत नाहीत, सर्व रा. उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले तीनही आरोपी फरार झाले आहेत.
दरम्यान तळवडी चौकातील अंडाबुर्जीच्या टपरी चालकाला कोयता व लाकडी दांड्याच्या सहाय्याने मारहाण करणाऱ्या पाचपैकी तिघांवर गुन्हा दाखल केल्याने उरुळी कांचन पोलीस दोन आरोपींवर मेहरबान का? असा सवाल उपस्थित झाला आहे. यामुळे उरुळी कांचन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तळवडी चौकात लखन ढवळे यांची ‘लखन अंडेवाले’ या नावाची टपरी आहे. ढवळे यांनी गुरुवारी (ता.23) नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास टपरी चालू केली. दरम्यान, धीरज नागटिळे, सैलानी शेख व अदित्य मानकर हे टपरीवर रिक्षा आणि एका मोटार सायकलवरून रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आले. त्यांनी भुर्जी पाव ऑर्डर दिली. भुर्जी पाव खाऊन झाल्यानंतर ते उठून जाऊ लागले. तेव्हा लखन ढवळे यांनी त्यांना बिलाचे 540 रूपये मागीतले.
पैसे मागितल्याचा राग आल्याने फिर्यादी लखन ढवळे यांना सैलानी शेख याने शिवीगाळ केली. तसेच कसले पैसे आम्हाला मागतो. आम्ही पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर, असे म्हणाला. त्याचवेळी इतर दोघांनी लखन ढवळे यांना हाताने मारहाण केली. तसेच धीरज नागटिळे याने त्याच्या कमरेला लावलेला चाकू काढून ढवळे यांच्या पोटाला लावला. तर सैलानी शेख याने टपरीच्या गल्ल्यातील 2700 रुपये जबरीने काढुन घेतले. त्यानंतर आरोपींनी जाताना टपरीच्या गाडयावरील अंडी, पाण्याचा जार तसेच कढईतील तेल पायाने ढकलुन दिले. तसेच ढवळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघुन गेले.
त्यानंतर फिर्यादी लखन ढवळे यांनी तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली संपूर्ण हकीगत पोलिसांना सांगितली. मात्र, त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. पोलिसांनी ढवळे यांना माघारी पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी ढवळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आबासाहेब चव्हाण, उरुळी कांचन शहराध्यक्ष आकाश कांचन यांनी याप्रकरणी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची भेट घेतली.
त्यानंतर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करुन घेतला. पंधरा तासांच्या दिरंगाईनंतर गुन्हा दाखल करताना, उरुळी कांचन पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने पाच ऐवजी तीनच आरोपीं गुन्ह्यात सहभागी असल्याचा उल्लेख ‘एफआयआर’मध्ये केल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मण उर्फ लखन धोंडीबा ढवळे यांनी केला आहे.
याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मण उर्फ लखन ढवळे म्हणाले, अंडाभूर्जीच्या गाडीवर ५ जण जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर पैसे मागितले असता त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. कोयत्याचा नंगानाच करून दहशत निर्माण केली. तसेच पोटाला कोयता लावून मुंडके तोडून टाकेल, अशी धमकी दिली. आम्ही इथले भाई आहोत.
आमच्यातील प्रत्येकाला प्रतिमहिना ५०० रुपये द्यावे लागतील, असे म्हणून गल्ल्यातील पैसे काढून घेतले. पोलीस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करीत होते. पाचपैकी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांची नावे अलगद बाहेर काढली आहेत. तसेच तक्रारीमध्ये कोयत्याच्या ऐवजी चाकूची नोंद केली आहे. त्यामुळे खूप मोठे आर्थिक राजकारण झाले असावे, असा आरोप ढवळे यांनी केला आहे.
दरम्यान याबाबत पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता मनोज पाटील म्हणाले, तळवडी चौकातील अंडाबुर्जीच्या टपरी चालकाला कोयता व लाकडी दांड्याच्या सहाय्याने मारहाण करून टपरी चालकाच्या गल्ल्यातील सत्ताविशे रुपये लुटणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे. संशयित आरोपी सापडले की गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अशा पध्दतीने गुन्हा दाखल करावा, अशा सुचना वरीष्ठांनी दिल्यानेच गुन्हा दाखल करण्यास विलंब झालेला आहे. दरम्यान पत्रकारांनी मनोज पाटील यांना “आरोपी सापडल्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतची” तरतुद कायद्यात आहे का? अशी विचारणा केली असता पाटील यांनी वरिष्ठांशी बोला, असे म्हणत फोन बंद केला.
दरम्यान याबाबत उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची भेट घेतली असता पाटील म्हणाले, तळवडी चौकातील अंडाबुर्जीच्या टपरी चालकाला झालेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. गुन्हा दाखल करण्यास नेमका विलंब का झाला? याची माहिती घेतली जाईल. या प्रकरणातील फिर्यादीने रात्री तीन संशयित आरोपींची नावे पोलिसांना दिली होती. तर सकाळी तो पाच जण होते, असे सांगत आहे. याबाबतही चौकशी करुन पुढील तपास केला जाणार आहे.
‘पुणे प्राईम न्यूज’चे उरुळी कांचन पोलिसांना पाच प्रश्न…
1) गुन्हा घडल्यानंतर “एफआयआर” नोंद करण्यास पंधरा तासाचा विलंब का?
2) फिर्यादी आरोपींची संख्या पाच असल्याचे सांगत असताना “एफआयआर”मध्ये तीनच जणांची नोंद का?
3) फिर्यादी हाणामारीत कोयत्याचा वापर झाल्याचा उल्लेख करत असताना “एफआयआर”मध्ये कोयत्या ऐवजी चाकूचा उल्लेख का?
4) संशयित आरोपी ताब्यात घेतल्यानंतरच गुन्ह्याची नोंद हा कायद्यातील बदल फक्त उरुळी कांचन पोलिसांनाच लागू की संपुर्ण राज्यात याची अंमलबजावणी होणार?
5) संशयित आरोपी ताब्यात घेतल्यानंतरच गुन्ह्याची नोंद अशी भूमिका घेतली असताना पंधरा तासाच्या विलंबानतर संशियत आरोपी ताब्यात आले नसतानाही गुन्हा दाखल कसा केला?