देहूरोड : भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याच्या अड्ड्यावर देहूरोड पोलिसांचा छापा टाकून ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वा दोन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
देहूरोड पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एक व्यक्ती मुकाई चौक येथे बनावट नोटा वितरीत करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मुकाई चौकाकडून आदर्शनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. या वेळी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या दुचाकीवरून फिरताना आढळून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ५०० रुपयांच्या १४० बनावट नोटा आढळून आल्या.
दरम्यान, आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी आधिक चौकशी केली असता, बनावट नोटा भोसरी गावच्या हद्दीत, दीप लॉन्सजवळ, दिघी मॅक्झीन (ता. हवेली, जि. पुणे) येथे छापत असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी छापा मारला.
पोलिसांनी या छाप्यात ३०० बनावट नोटा, इंडीयन करंसी पेपरवर नोटांचे चित्र प्रिंट केलेले ११९७ पेपर, नोटा छापण्यासाठी लागणारी ऑफसेट प्रिंटींग मशिन, लॅपटॉप, प्रिंटर, पैसे मोजण्याची मशीन, इंडियन करंसी पेपर, शाई, पेपर कटींग मशिन व इतर नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याठिकाणी नोटा छापणाऱ्या ५ व्यक्ती आढळल्या. पोलिसांनी एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजार केले असता, न्यायालयाने आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अद्याप पर्यंत एकूण ५०० रुपये दराच्या ४४० बनावट नोटा आरोपीकडून जप्त केल्या असून, अर्धवट छापलेल्या ४,७८४ बनावट नोटा व १००० करन्सी पेपर जप्त केले आहेत. प्रथमदर्शनी यातील आरोपी सुरेश यादव याने अलिबाबा या वेबसाईटवर स्वतःचे अकाउंट उघडून त्यामार्फत चीनमधुन भारतीय करंन्सीचे पेपर ऑनलाईन मागविल्याचे दिसून येत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव, पोलीस हवालदार बाळासाहेब विधाते, प्रशांत पवार, सुनिल यादव, पोलीस अंमलदार किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, मोहसीन आत्तार, युवराज माने, विवेक मिसे, राजेंद्र चव्हाण, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, सागर पंडीत आणि निलेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.