Dehu News| पुणे : जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या निवडणुकीत पुरुषोत्तम मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली.
अध्यक्षपदासाठी अटीतटीच्या लढाई झाली. या लढाईत पुरुषोत्तम दत्तात्रय मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या नऊ मतांनी पराभव केला.
पुण्यातील देहूच्या जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे पुरुषोत्तम मोरे हे आता अध्यक्ष काम पाहणार आहेत. मावळते अध्यक्ष नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने रविवारी २६ मार्चला नवा अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे आणि उमेश सुरेश मोरे हे दोन उमेदवार रिंगणात होते.
या दोघांपैकी कोण अध्यक्ष होणार, याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले होते. रविवार २६ मार्चच्या सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मतदान झाले. तर पुढच्या काही तासांत नवनिर्वाचित अध्यक्ष कोण हे स्पष्ट झाले. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पित्ती धर्मशाळेत पार पडली.
जगदगुरू संत तुकाराम महाराज देवस्थानवर यावेळी अध्यक्षपदाची संधी ही गणेशबुवा शाखा दोनला होती. या अध्यक्षाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. आबाजीबुवा शाखा न.१ मध्ये (९२) गणेशबुवा शाखा न.२ (१४०) आणि गोबिंदबुवा शाखा न.३ (१४०) असे एकूण ३७२ मतदार होते. त्यापैकी ३२२ जणांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदान केले. नवनिर्वाचित अध्यक्ष पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे यांना १६४, तर उमेश मोरेंना १५५ मते मिळालीत.