पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाची ‘जॉईंट व्हेंचर’मध्ये ९० गुंठे जमीन विकसित करण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २ एप्रिल २०१४ ते २९ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान पिसोळी येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुचेत शांतीलाल ओसवाल (रा. पदमजी क्लासिक, नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुशील घन:शाम अगरवाल (वय ४०, रा. लुल्ला नगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले, दहा वर्षांपूर्वीचा हा व्यवहार आहे. सुशील आगरवाल यांचा बांधकाम व्यवसाय असून सुचेत ओसवाल हे त्यांच्या ओळखीचे आहेत. ओसवाल यांची पिसोळी येथे ९० गुंठे जागा आहे, ती विकसित करायची असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सुचेत ओसवाल यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
त्यानंतर त्यांच्यामध्ये ही जागा विकसित करण्याबाबत २ एप्रिल २०१४ रोजी ५०० रुपयांच्या मुद्रांकावर समजुतीचा करारनामा करून २५ लाख रुपये त्यांच्याकडून घेण्यात आले होते. मात्र, फिर्यादी यांना विश्वासात न घेता त्यांच्या परस्पर ही जमीन दुसऱ्याच व्यक्तींना विकण्यात आली. ही माहिती अगरवाल यांना समजल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना नोटीस पाठवण्याची तजवीज करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.