दीपक खिलारे
इंदापूर : राज्य शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले. या अनुषंगावर इंदापूर येथे शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे व माऊली वणवे यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दुधाने स्नान घालण्यात आले.
शासन निर्धारित 34 रुपये दराप्रमाणे दुधाची शेतकऱ्यांकडून खरेदी करावी या मागणीसाठी इंदापूर तहसीलसमोर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने 4 ते 11 डिसेंबर असे अकरा दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन दुधाला पाच रुपये दर जाहीर केला. या निर्णयामुळे उपोषणकर्ते दीपक काटे व माऊली वणवे यांना शेतकऱ्यांकडून दुधाने आंघोळ घालण्यात आली. फटाके फोडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी दीपक काटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचे आभार मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.