पुणे : महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी दीपक महादेव चव्हाण यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यवतमाळ येथे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
दीपक चव्हाण यांची सर्वानुमते राज्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अजय गौरकार व गजानन टाके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हमन माळवी, डॉ. रविंद्र देशमुख, नंदकुमार बुटे, किशोर पोहनकर, मंगेश वैद्य, प्रशांत कापडे, विलासराव कुरणे यांच्यासह विविध कर्मचारी नेते उपस्थित होते.
दरम्यान, या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी हेमंत माळवी तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रविंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशन काळात शासनाकडे महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. आगामी काळात शासनाकडून आपल्या समस्या व मागण्या सोडवताना कणखर भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये दिलीप कोलेवाड, प्रशांत कापडे, भैरवनाथ मुंढे, शैलेंद्र सुरेशसिंग परदेशी, दिपाली सचिन तारु, राजश्री आचार्य, शोभना मेश्राम, सन्यवान माळवे, कैलास कोळेकर, अभिजित येवले, नजीर कुरेशी, विशाल डुकरे, गोवर्धन माने, धैर्यशिल जाधव, प्रणिल पाटील, गणेश साबळे, गजानन खडसे यांचा समावेश करण्यात आला आहे.
मागण्यासाठी जोरकस लढा उभारणार
यावेळी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना नवनिर्वाचित राज्याध्यक्ष दीपक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांना वेठबिगार समजून, त्यांच्यावर नवनवीन योजनांचा भार सोपविण्यात येतो. मात्र, पदांची निर्मिती केली जात नाही. यासह आकृतीबंध, वेळेवर वेतन न करणे, पदोन्नतीमध्ये होणारा विलंब इत्यादी मागण्यासाठी जोरकस लढा उभारणार आहे.