पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला. वीस वर्ष वय असलेला साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार आहेत. हा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीचा वादातून झाल्याचे आरोपींनी म्हटले आहे. परंतु, त्यांचा हा काही दावा पटणारा नाही. यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी सखोल आणि कसून चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. एकमेकांसमोर बसवून आरोपींची चौकशी केली जात आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण दिसते तेवढे साधे अन् सोपे नाही. यामागे एक मोठा नियोजनबद्ध कट आहे. गुन्हेगारी विश्वातील आरोपी किंवा इतर कोण व्यक्ती यामागे आहे का? याचाही तपास केला जात आहे. यामुळेच पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावले होते. पोलिस आयुक्तालयात सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्याकडून त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा बोलवले. हा गुन्हेगार सध्या एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि शरद मोहोळचा जोरदार वादही झाला होता.
दरम्यान खून केल्यानंतर आरोपींनी एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचे सांगितले जात आहे. आरोपींनी या घोषणा का दिल्या? खुनाचा तपास भरकटवायचा आहे का? किंवा दुसऱ्या एका गुंडांने शरद मोहोळ याला मारण्याची सुपारी दिली, यासंदर्भात तपास केला जात आहे. या प्रकरणात मारणे टोळीचा सहभाग आहे का? कारण संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहळ याने मारणे टोळीतील एकाला मारून बदला घेतला होता. यामुळे शरद मोहोळ मारणे टोळीच्या रडारवर होता, असे बोलले जाते. त्यातूनच मोहोळ याचा ‘गेम’ झाला का? ही शक्यता पुणे पोलीस तपासात आहे.