अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील भीमा नदीमध्ये कुजलेल्या अवस्थेतील पुरुष जातीचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह पूर्णपणे डीकंपोज झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वढू बुद्रुक गावाच्या हद्दीत भीमा नदीच्या काठाला एक मृतदेह तरंगत असल्याचे मच्छीमारांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती वढू बुद्रुकचे पोलीस पाटील जयसिंगराव भंडारे यांना मिळाली. भंडारे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला संबंधित मृतदेहाची माहिती दिल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला.
दरम्यान, संबंधित मृतदेह पुरुष जातीचा असून पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. शरीरावर राखाडी रंगाचा टी-शर्ट, अंदाजे 30 ते 35 वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आहे. घटनास्थळावर शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरिय तपासणी केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.