लोणी काळभोर : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या निर्णयाविरोधात खोतीदार व्यवसायिकांनी एल्गार पुकारला आहे. तसेच १५ जानेवारीपासून शेतकऱ्यांचा माल काढण्याचे बंद केले आहे. या ‘बंद’मुळे शेतकऱ्यांची पंचायत झाली असून, लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संचालक मंडळाने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आता शेतकऱ्यांनीच दिला आहे.
हडपसर भाजीपाला मार्केट येथील जागेची मर्यादा लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीने शेवाळवाडी येथे उपबाजार स्थलांतरित केला आहे. १३ वर्षांपूर्वी (कै.) अण्णासाहेब मगर उपबाजार नावाने सुरू झालेल्या या मार्केटमध्ये खोतीदार अनेक वर्षांपासून हवेली, दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल काढून या उपबाजारात विक्रीसाठी आणत होते. बाजार समितीच्या वतीने या खोतीदारांकडून सर्व प्रकारचा महसूल घेतला जात होता.
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खोतीदारांचा ‘असहकार’
दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. नव्या संचालक मंडळाने फतवा काढून खोतीदारांना या उपबाजारात व्यवसाय करण्यास मज्जाव केला व त्यांचे परवाने देखील रद्द केले. संचालक मंडळाच्या या जुलमी ठरावामुळे खोतीदारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागितली. उपमुख्यमंत्र्यांनी संचालकांना सांगूनही संचालक मंडळाने मात्र आपला हेका कायम ठेवला व खोतीदारांना या बाजारात प्रवेश नाकारला. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खोतीदार व्यवसायिकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे.
भाजीपाला न काढल्याने शेतकरी हवालदिल
१५ जानेवारीला संक्रातीचा मुहूर्त डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी सर्व चारचाकी वाहने वडकी येथील एका मैदानामध्ये पार्क केल्या व सर्व शेतकऱ्यांचा भाजीपाला न काढण्याचा निर्णय एकमताने घेतला. शेतकऱ्यांचा भाजीपाला काढणे बंद झाल्याने हवेली, दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तीन तालुक्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
संचालक मंडळ नुकसानभरपाई देणार का? शेतकरी उदविग्न
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने पारंपरिक खोतीदारांना मज्जाव करून शेतकऱ्यांवर देखील अन्याय केला आहे. सनदशीर मार्गाने मागणी करूनही संचालक मंडळाने आपला हेका कायम ठेवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात लाखो रुपयांचा माल जो काढण्यावाचून राहिला आहे, त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. भाजीपाला काढणीला वेळ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवला आहे. झालेले नुकसान संचालक मंडळ देणार आहे का? असा उदविग्न सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी, खोतीदारांचे कुटुंब व कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर
पूर्वापार चालत आलेल्या गावगाड्यातून खोतीदार हा व्यवसाय गावोगावी चालत आहे. हवेली व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल ४० ते ५० खोतीदार काढतात. सुमारे एक लाख पालेभाजी जुडी रोज काढली जाते. शेवाळवाडी उपबाजारात सुमारे ६० हजार जुडी विक्री होते. या व्यवसायावर खोतीदार चालक व कामगार महिला मिळून सुमारे ६०० लोकांना रोजगार मिळतो. संचालक मंडळाने मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने शेतकरी, खोतीदार व कामगारांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांच्या त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान, एकीकडे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचा गाजावाजा करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मनमानी करणाऱ्या संचालक मंडळापेक्षा प्रशासक बसवा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.