सविंदणे / अमिन मुलाणी : कारखान्याला ऊसतोड कामगार पुरवतो, असे सांगून चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी संपत पानमंद यांची तब्बल साडेबारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात राजेंद्र मोरे (रा. पिंपरखेड ता. चाळीसगाव जि. जळगाव) याच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदोह येथील संपत लक्ष्मण पानमंद (वय ५९) यांनी फिर्याद दिली. त्यांचा शेतीसह कामगार घेऊन ऊसतोड करून ऊस कारखान्याला पुरवण्याचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांची आरोपीसोबत ओळख झाली. ऊसतोड करण्यासाठी कामगार पुरवतो सांगून कामगारांना देण्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून वेळोवेळी तब्बल साडेबारा लाख रुपये पानमंद यांनी मोरे याला दिले. परंतु, ऊसतोडणीसाठी मजूर पुरविले नाहीत. दिलेले पैसे परत मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याने पानमंद यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उगले हे करत आहेत.