पुणे : पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज सकाळी पुण्यातून मुंबईकडे रवाना झाली. त्याचवेळी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांच्या खालून बुधवारी सकाळी अचानकपणे धूर येऊ लागला. कर्जत स्थानकानजीक ही घटना घडली. या प्रकारामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर तातडीने गाडी थांबवून दुरुस्ती करण्यात आल्याने पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, वातानुकूलित डब्यांतील समस्या दूर करण्यात आली असली, तरीही गाडीच्या वातानुकूलित डब्यांच्या दोन्ही बाजूने धूर निघत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुण्यातून मुंबईकडे रवाना झाल्यानंतर लोणावळ्यात थांबा घेतला. त्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. गाडी सुरळीत चालली असतानाच कर्जत स्थानकाच्या अलीकडे गाडीच्या ‘सी ३’ आणि ‘सी ४’ या वातानुकूलित डब्यांखालून धूर येऊ लागला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कर्जत स्थानक गाठायच्या आतच गाडी तातडीने थांबवण्यात आली. दुरुस्ती करून गाडी पुढे सोडण्यात आली. यामुळे गाडीला ३५ मिनिटे उशीर झाला. वातानुकूलित डब्यांतील समस्या दूर करण्यात आली तरीही गाडीच्या वातानुकूलित डब्यांच्या दोनी बाजूने धूर निघत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.
दरम्यान, यापूर्वी ऑक्टोबर २०१२ मध्ये गाडीच्या महिला डब्याला आग लागली होती. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. त्यानंतर २०२३ रोजी गाडीच्या डब्यांखालून धूर निघाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने रेल्वेकडून गाडीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला आहे.