पुणे : बारामती शहरात काही दिवसांपूर्वी गँगवारची घटना घडली होती. या गॅंगवारमधील एका युवकाचा मृत्यु झाला आहे. तरुणाला लाठ्या काठ्या आणि गजानं बेदम मारहाण करण्यात आली होती, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. अनिकेत धोत्रे असं या मृत तरुणाचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बारामती शहरातील मुख्य चौकात चायनीज गाड्यावर आलेल्या अनिकेत धोत्रे या युवकाला ६ जणांनी अमानुष मारहाण केली होती. १७ मार्चरोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. टोळक्यांनी त्याला लाठ्या काठ्या आणि गजाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये अनिकेत गंभीररीत्या जखमी झाला होता. पूर्व वैमान्यासातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेत अनिकेत बेशुद्ध पडला होता. अशा अवस्थेत त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खाजगी हॉस्पिटलमध्ये अनिकेतवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अनिकेतचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. शहर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पूर्व वैमान्यासातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमोल पवार, विनोद धोत्रे, सुमित धोत्रे, हनुमंत धोत्रे, नवनाथ धोत्रे अशी या प्रकरणातील गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आली आहे.