पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडुन साकारण्यात आलेल्या रामनगर गणपती माथा टेकडीवरील नागरी वन उद्यानातील खाणीतील पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.15) दुपारच्या सुमारास वारजेतील रामनगर परीसरात घडली आहे. दक्ष सुशांत कांबळे (वय-१३, रा. रामनगर, वारजे, पुणे) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील रामनगर टेकडी परीसराजवळ नागरी वन उद्यान आहे. या उद्यानातील खाणीत पावसाचे पाणी साचले आहे. या खड्यामध्ये १५ आगस्ट रोजी दुपारच्या सुमारास चार लहान मुले पोहायला गेली होती. त्यातील मृत दक्ष कांबळे हा पोहताना पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेले तिन मुले घाबरून गेल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहीती घरी दिली नाही.
मात्र, सायंकाळ पर्यंत दक्ष घरी न आल्याने कुटुंबांनी शोधाशोध करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता, तो खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहीती दिली. या घटनेची माहीती वारजे माळवाडी पोलीसांना मिळताच वारजे पोलीस आणि वारजे अग्निशमन दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोध कार्य केले. मात्र मृतदेह सापडला नाही. त्यानंतर पोलीसांनी आणलेल्या एका व्यक्तीने रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास खाणीतील पाण्यात उतरून मुलाचा मृतदेह शोधला. त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णालयत पाठविण्यात आला. या घटनेने रामनगर परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.