पुणे : राजगड तालुक्यातील खानापूर रांजणे-पाबे घाट रस्त्यावरील दुर्गम डोंगरावरील वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी करताना खाली पडुन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यु झालेल्या तरुणाला पाबे खिंडीतील दुर्गम डोंगरात त्याच्या दोन मित्रांनी खड्डा करून त्यात पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. बसवराज पुरंत मंगनमनी (वय-२२, सध्या रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, मुळ रा. तुळजापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गम डोंगरावरील टॉवरवर चढून तारांची वायर कापताना बसवराज हा १५० फुट खाली कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे दोन मित्र रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे (दोघे रा. पाबे, ता. राजगड) यांनी पाबे डोंगरात खड्डा खोदून त्याचा मृतदेह पुरून ठेवला. या घटनेची माहिती गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री वेल्हे पोलीसांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांच्यासह पोलिस जवान रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलस्कर गुलाब भोंडेकर, संजय चोरघे आदींनी मध्यरात्री दुर्गम पाबे डोंगरात धाव घेतली. मात्र, अंधार आणि सततच्या पावसाने पहाटे साडेतीन वाजेपर्यंत घटनास्थळाचा शोध पोलिसांना लागला नाही.
दरम्यान, मृत बसवराज याच्या दोन मित्रांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांना घटनास्थळी आणण्यात येणार आहे. बसवराज हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दिली होती. पुढील तपास सिंहगड पोलिस करणार आहेत.
नेमकं काय घडलं?
गेल्या महिन्यात १३ जुलै रोजी राजगड तालुक्यातील रांजणे येथे असलेल्या महावितरण कंपनीच्या वीजेच्या टॉवरच्या तांब्याच्या तारा चोरी करण्यासाठी मृत बसवराज मंगनमनी याच्यासह त्याचे दोन मित्र रुपेश येनपुरे आणि सौरभ रेणुसे हे तिघेजण गेले होते. बसवराज हा टॉवरवर चढुन लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापत होता. त्यावेळी तो खाली कोसळला. या घटनेत गंभीर जखमी झालेला बसवराजचा जागीच मृत्यु झाला. या घटनेनंतर त्याचे मित्र रुपेश व सौरभ याने त्याचा मृतदेह पाबे घाटात आणून मंदिरासमोरच्या दुर्गम डोंगरात खड्डा खोदून पुरला आणि दोघे पसार झाले.