लोणी काळभोर : ज्या दिवशी तुमच्या कर्तृत्वाने आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतील, त्या दिवसानंतर जगातील कुठल्याही सर्टिफिकेटची तुम्हाला भासणार नाही. त्यामुळे आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करा. भरभरून यश संपादन करा, असा मोलाचा सल्ला हभप डॉ. पंकज महाराज गावडे यांनी दिला.
समाजभूषण गणपतराव काळभोर यांच्या ३४ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे होते. या वेळी आमदार अशोक पवार, जगदीश मुळीक, ज्येष्ठ नेते माधव काळभोर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके, सरपंच शिवराज घुले, मोहन कलाटे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच प्रियांका काळभोर, चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच राजाराम काळभोर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, समाजभूषण गणपतराव काळभोर यांचे कुटुंबिय, विद्यार्थी-विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना हभप डॉ. पंकज महाराज गावडे पुढे म्हणाले की, आई-वडील, शिक्षक यांना गुरु मानले तर तुम्ही जीवनात यशस्वी होणार यात शंकाच नाही. तुमच्या कला गुणांना वाव द्या. का शिकतोय हे समजून, जाणून घ्या. खायला भाकरी नसणाऱ्या काळात डॉ. बापूजी साळुंखे व समाजभूषण गणपतराव काळभोर यांनी संस्था उभी केली. पुस्तके वाचा, ध्येय मनात ठरवा, व्यसने करु नका. आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणायचे की दुःखाचे अश्रू हे तुम्ही ठरवा. गुणवत्ता वाढवा, उच्च पदे मिळवा, टाईम मॅनेजमेंट करा, असे आवाहन त्यांनी केले.