पुणे: राज्यात सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवून मंगळवारपर्यंत (दि. 2 सप्टेंबर) करण्यात आली आहे. याची नोंद विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी घ्यावी, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी आवाहन केले आहे.

राज्यात अकरावी प्रवेशासाठी 9,535 महाविद्यालयांमध्ये 18,15,165 जागा कॅप प्रवेशासाठी तर 3,44,067 जागा कोटा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यामुळे एकूण 21,59,232 जागा विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. आतापर्यंत 14,79,654 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 11,44,583 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1,67,078 विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत प्रवेश घेतला असून, एकूण 13,11,661 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. मात्र अद्याप 6,70,582 जागा कॅप प्रवेशासाठी आणि 1,76,989 जागा कोटा प्रवेशासाठी रिक्त आहेत. एकूण 8,47,571 जागा अद्यापही प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
शुक्रवारी (दि. 29) ओपन टू ऑल विशेष फेरीत कला शाखेसाठी 1,09,747, वाणिज्य शाखेसाठी 19,719 आणि विज्ञान शाखेसाठी 16,387 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. यापैकी 35,439 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला. त्यापैकी 32,770 विद्यार्थी कॅप फेरीत तर 2,669 विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेश घेतले आहेत.







