नारायणगाव : नारायणगाव येथील पुणे-नाशिक बायपास महामार्गाजवळ सुमारे पाच वर्षांचा नर विबट मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली. पुणे-नाशिक बायपास महामार्गावर सोमवारी (दि. ९) दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास हॉटेल सचिनच्या बाजूला प्रकाश शंकर पाटे यांच्या शेताच्या पुढे पाच वर्षांचा नर बिबट मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती स्वप्नील गंगाराम पाटे यांनी वारूळवाडी गावाचे सुशांत भुजबळ यांना फोनद्वारे दिली.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बिबट्याला त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन माणिकडोह निवारा केंद्राकडे रवाना केले. या घटनेत नर बिबट्याचा शरीरावरील खुणांवरून दोन बिबट्यांमध्ये भांडणे होऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.