अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डीमधून एक माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात स्त्री जातीच बेवारस अर्भक प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडीत आढळून आलं आहे. ही घटना काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सफाई कामगार साफ-सफाई करत होते त्यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्थानच्या दाव्यानं प्रकरणाचे गूढ वाढलं
दरम्यान, एका कॅरीबॅग मध्ये काहीतरी जड वस्तू दिसल्यामुळे ते उघडून पाहिले असता त्यात स्त्री जातीच अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल मृत अवस्थेतील अर्भक आढळून आलं आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चौकशी केल्यानंतर अर्भक हे साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात जन्माला आले नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
याबाबत साईबाबा संस्थान पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही तपासणी सुरू करण्यात अली आहे. साईबाबा संस्थानच्या रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी सध्या पोलीस प्रशासन करत आहे. नेमकं हे अर्भक कुणी आणून टाकलं आणि का? या बेवारस मृत अर्भकाचे आई-वडील कोण? याचा तपास करण्याचे आवाहन पोलिस रुग्णालय प्रशासनासमोर आहे.
सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणी अधिक माहिती अशी कि, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ते बेवारस मृत अर्भक अज्ञाताने साईनाथ रुग्णालयाच्या कचरा कुंडीत आणून टाकले असा दावा केला आहे. अर्भकाचा मृतदेह गळा आवळलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती ही गाडीलकर यांनी दिली आहे. यासोबतच त्या दिवशी रुग्णालयात एकही प्रसूती झाली नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. साई संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्याने या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा कसून तपास पोलीस करत आहेत.