खडकवासला : खडकवासला धरण परिसरात पुन्हा एका तरुणीचा मृतदेह चौपाटीजवळ पंप हाऊसच्या बाजूला आढळून आला आहे. मुस्कान रहिम शेख (वय २२, मूळ रा. किनवट, नांदेड, सध्या रा. उत्तमनगर, एनडीए, पुणे) असे मृत तरुणीचे नाव असून, पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. मंगळवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली.
खडकवासला धरण चौपाटीजवळ पाण्यात मृतदेह आढळून आला. खडकवासला पाटबंधारे विभागाचे अतिक्रमण अधिकारी रतीकांत भांगे यांनी घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला कळवली. पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवान विष्णू सानप, शुभम मिरगुंडे, ज्ञानेश्वर बुधवंत, भाऊसाहेब आव्हाड व प्रतीक शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी खोल पाण्यातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नीलेश राणे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत तरुणी मुस्कान शेख शहरातील एका कॉलसेंटरमध्ये नोकरी करत होती, तर तिचे वडील वाहन चालक आहेत.