पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुठ्ठयाच्या एका खोक्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. खोक्यात कोंबलेला मृतदेह पाहून पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. या खून झालेल्या तरुणाची ओळख अध्याप पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेने पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर परिसरात असलेल्या हिंगणे मळा कालव्याच्या शेजारी शुक्रवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह एका खोक्यात भरला आहे. एवढंच नाही तर या खोक्याला सर्व बाजूने प्लास्टीक गुंडाळण्यात आले होते. हे खोके हिंगणे मळा कॅनॉलच्या जवळच टाकून दिले आहे. या खोक्यात मृतदेह असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलिसांना तातडीने माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोके उघडले असता हा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले. हडपसर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपासाला सुरुवात केली आहे.