बारामती: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. २८) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार सात वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, शहरातील कसबा येथून मिरवणूक काढून प्रशासकीय भवन येथील तहसील कचेरीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच दुपारी २ वाजता श्रीक्षेत्र कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ होणार असून, येथे जाहीर सभा होणार आहे. सोमवारी प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचाराच्या रणनीतीबाबत काय बोलणार याची उत्सुकता आहे.