पुणे : पुण्यात दिवसा घरफोडी करुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता चतु:श्रृंगी पोलिसांनी दिवस घरफोडी करणाऱ्या मुंबईतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल 20 लाख 14 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन नालासोपारा, पालघर येथून मोहमद रईस अब्दुल आहद शेख (वय-37 रा. तैयबा मस्जिद जवळ, मालवणी, मुंबई) तसेच जोगेश्वरी पुर्व येथून मोहमद रिजवान हनीफ शेख (वय-33 रा. जोगेश्वरी पुर्व, मुंबई) यांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 23 फेब्रुवारी रोजी सकाळनगर, बाणेर रोड परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी आरोपी मुंबई परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली.
त्या माहितीच्या आधारे पथकाने मुंबईत जाऊन दोघांना ताब्यात घेत त्यांची पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी केली असता 30 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली कटावणी, पोपट पाना व स्कू ड्रायव्हर असा एकूण 20 लाख 14 हजार 364 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान, अटक केलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मोहमद शेख याच्यावर 30 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर मोहमद रिजवान शेख याच्यावर सहा पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.