गणेश सुळ
केडगाव : भाजपचे बळ दौंडच्या विकासासाठी वरदान ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते शनिवारी (ता. २४) दौंड तालुक्यातील देलवडी, नाथचीवाडी, एकेरीवाडी याठिकाणी मंजूर कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार कुल यांच्या विकासाच्या ध्येयामुळे दौंड तालुका स्वाभिमानाने झेपावतोय आणि दौंड प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचे चित्र दौंडच्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
या उद्घाटनप्रसंगी आमदार राहुल कुल म्हणाले की, मंजूर कामांचा सपाटा सुरू असतानाच पुन्हा रस्त्याच्या कामांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून ३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुणे जिल्ह्यातील जल जिवन मिशनचे पाहिले काम देलवडी गावामध्ये पूर्णत्वास गेल्याचे मत आमदार कुल यांनी व्यक्त केले. यासाठी मोठे योगदान असलेले नाडगौडा व ठेकेदार दत्तात्रय शेलार तसेच आवाळे यांचा शाल व श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना राहुल कुल म्हणाले की, स्वर्गीय सुभाष कुल यांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. यासाठी राहू येथे १३ बंधारे बांधून शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. परंतु यावरच न थांबता, ५० ते १०० वर्षे शेतीसाठी पाणीटंचाई होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत आहे. मुळशी धरणातून ७ ते ९ टीएमसी पाणी वळविण्याची खात्री त्यांनी या वेळी दिली. यासाठी ९ देशांच्या प्रतिनिधींनी भेट दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
भामा आसखेड आवर्तन सोडून सर्व शेतीसाठी पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महावितरणकडून ७ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. तसेच नवीन प्रांत कार्यालयाच्या इमारतीसाठी देखील ७ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केल्याची माहिती कुल यांनी दिली. दौंड तालुक्यात वरवंड येथे ग्रामीण रुग्णालय, दौंड येथे प्रांत कार्यालय,ंन्यायालय, ग्रामीण पोलीस स्टेशन अशी विविध कामे केल्यामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांना बाहेर जाण्याचा त्रास थांबला आहे. तसेच वीज, पाणी यासाठी देखील मी कायम प्रयत्नशील असल्याचे मत राहुल कुल यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमप्रसंगी राजाभाऊ काटे, सागर भालेराव, कार्तिक कोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास टकले यांनी केले. तर आभार डी. आर. शेलार यांनी मानले. या वेळी विकास शेलार, हरिभाऊ ठोंबरे, गणेश जगदाळे, नीलम काटे, भानुदास टकले, पोपट शेलार, उत्तम लव्हटे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.