संदीप टूले
केडगाव : चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नीला उसाच्या शेतात नेऊन, तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी दौंड तालुक्यातील मलठण येथे घडली. दरम्यान, उसाच्या शेतात अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याने साडीला लागलेल्या आगीचा भडका उडून ऊसाच्या शेतातही आग पसरली. तत्काळ दखल घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. आरोपी पती विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
राहुल विष्णु लोंढे (रा. मलठण, ता. दौंड, जि. पुणे) असे आरोपी पतीचे नाव असून, गौरी उर्फ सुमन राहुल लोंढे (वय ३५) असे पीडित पत्नीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी उर्फ सुमन राहुल लोंढे या आपल्या पतीसोबत शनिवारी (ता. ६) पहाटे सहा वाजता शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतात कांदा लागवडीचे काम चालू होते. काम झाल्यावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पती राहुल याने उसाला पाणी द्यायचे आहे, असे म्हटल्याने पत्नी उसाच्या शेजारी गेल्यावर पती राहुल यांनी काय समजायच्या आतच त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीमधून आणलेले पेट्रोल अंगावर टाकले व उसामध्ये ढकलून काडीपेटी लावून पेटवून दिले.
काही क्षणातच आगीच्या भडक्यामुळे साडीने पेट घेतला. यातून सावरत उसातून बाहेर आल्यावर पुन्हा पतीने तिला उसाच्या शेतात ढकलले, त्यावेळी तेथील उसाने देखील पेट घेतला होता. पेटलेल्या उसात ढकलल्यामुळे ती पुन्हा ओरडत रस्त्याच्या कडेने पळाली. त्याठिकाणी आसपासचे लोक जमा झाल्याने लोकांच्या मदतीने उपचारासाठी तिला दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, तेथून पुन्हा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पत्नी गौरी उर्फ सुमन लोंढे हिचे पती राहुल विष्णु लोंढे हे सतत चारित्र्यावर संशय घेऊन तसेच घरगुती कारणांमुळे आणि ‘तू मला आवडत नाहीस’ या कारणांवरून पत्नीशी वाद घालत होते. शनिवारी त्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
ही फिर्याद दिल्याने पती राहुल लोंढे यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पती राहुल लोंढे यालाही भाजले असल्याने त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक शहाजी गोसावी हे करीत आहेत.