दौंड: दौंड हे एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे, जे भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे रेल्वे जंक्शन सेवेत येऊन शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. इतकी वर्षे रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात सुमारे शंभर ते दीडशे एकर मोकळी जागा पडीक आहे. ही जागा रेल्वेने का मोकळी सोडली? हा प्रश्न आहे.
रेल्वे प्रशासनाने या भागात रेल्वेचे विविध प्रकल्प आणले असते, तर अनेक तरुणांना रोजगार मिळाला असता. दौंड शहराच्या बाजारपेठेवरही याचा सकारात्मक परिणाम झाला असता. मात्र, रेल्वे प्रशासनाने तसे न करता ही जागा टाकून दिली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मनमानीमुळे दौंड रेल्वे जंक्शनचे महत्त्व जवळपास संपुष्टात आले आहे. या स्थानकासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अनेक थांबे मागे घेण्यात आले आहेत. एकेकाळी गजबजलेले रेल्वे जंक्शन आता निर्जन झाले आहे. या रेल्वे स्थानकात भटकी कुत्री व प्राणी मोकळेपणाने फिरत असून स्थानकात गाड्या कमी असल्याने त्यांचा थांबण्याचा वेळही कमी झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन दौंड रेल्वे स्थानकाचे महत्त्व गमावून बसले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दौंडमधील नागरिकांच्या मागण्या
१. रहिवासी युवकांना रोजगार मिळावा यासाठी रेल्वे प्रशासनाची दीडशे एकर जमीन रेल्वे कार्यशाळा, कोचिंग डेपो, कारशेड इत्यादी विविध प्रकल्पांसाठी वापरण्यात यावी.
२. पुणे-दौंड रेल्वे मार्गासाठी उपनगरीय विभागाचा दर्जा प्रस्थापित करणे. तसेच पुणे-दौंड दरम्यान उपनगरीय EMU लोकल चालवणे.
३. पुणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा दौंड रेल्वे जंक्शनपर्यंत विस्तार.
४. पुणे उपनगरीय लोकल रेकच्या देखभालीसाठी स्वतंत्र EMU कारशेड बांधणे.
५. पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एसएफ एक्स्प्रेस, यशवंतपूरकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या एलटीटी एक्स्प्रेसला दौंड रेल्वे जंक्शनवर व्यावसायिक थांबा देण्याची तरतूद.
६. पुण्याहून उत्तर आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या पुणे स्टेशनवरील वाहतूक आणि गर्दी कमी करण्यासाठी पुणे रेल्वे जंक्शनऐवजी दौंड रेल्वे जंक्शनवरून मेल एक्सप्रेस गाड्या सोडणे.
७. मुंबईकडे जाणारी इंटरसिटी, डेक्कन, प्रगती, इंद्रायणी एक्स्प्रेस ट्रेनचा दौंड रेल्वे जंक्शनपर्यंत विस्तार करणे.
८. पुणे-दौंड विभागातील लोकल फेऱ्या वाढवणे.
दौंड रेल्वे जंक्शन हे पुणे रेल्वे स्थानकाच्या बरोबरीचे असल्याने आणि 1 एप्रिल 2024 पासून दौंड रेल्वे जंक्शन पुणे रेल्वे विभागामार्फत चालविण्यात येणार असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील वाहतूक आणि गर्दी कमी करण्यासाठी दौंड रेल्वे जंक्शनचा वापर करण्याची मागणी होत आहे. दौंड येथे एसी वेटिंग रूम, लिफ्ट, एस्केलेटर, प्रचंड वाहनतळ, रेक देखभाल आणि धुण्याचे क्षेत्र अशा विविध उच्च दर्जाच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासनाने या जंक्शनचा वापर करावा.
– पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपपुणे मेट्रोपॉलिटन झोनचा विस्तार वरवंडपर्यंत करण्यात आला असून पुणे ते वरवंड दरम्यान पुणे शहर बसेसच्या (PMPML) वारंवार फेऱ्या होत आहेत. मग रेल्वे प्रशासन पुणे-दौंड रेल्वे सेक्शनसाठी उपनगरीय झोन का मंजूर करत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. येत्या काही दिवसांत पीएमपीएमएल सिटी बसेस दौंड शहरापर्यंत वाढवल्या जातील, तरीही पुणे उपनगरीय लोकल दौंड जंक्शनपर्यंत वाढवण्यात आलेली नाही. रेल्वे बोर्डाने दौंडला उपनगरीय स्थानक म्हणून अधिसूचित केले पाहिजे आणि येथे उपनगरीय EMU लोकल सेवा चालवावी.
– श्री.अक्षय टेकवडे, एससीसी सदस्य, पुणे रेल्वे विभाग