दौंड : तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात दौंड पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले असून, मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तालुक्यातील तीन दारू अड्ड्यावर आणि दोन जुगार अड्डयावर कारवाया करण्यात आल्या आहेत.
दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामध्ये दौंड शहरातील गोवा गल्ली येथे तीन ठिकाणच्या दारूभट्टीवरून ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कच्चे रसायन व तयार हातभट्टीची दारू असा समावेश आहे. कल्पना शामू जाधव, बबिता रामदास जाधव, शिला जेम्स गायकवाड (सर्व रा. गोवागल्ली दौंड) या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर हायवेच्या लगत असलेल्या सेवा रस्त्यालगत पत्र्याच्या शेडच्या आडोशास ‘कल्याण मटका’ जुगारावर कारवाई करण्यात आली आहे. हे आरोपी मटक्याचे साहित्य जवळ बाळगून आपल्या ओळखीच्या लोकांना ‘कल्याण-मटका’ जुगार खेळत व खेळवत असताना दौंड पोलिसांना सापडले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी बाहेर आढळून आलेल्या दोन दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
लक्ष्मीकांत मनोहर लांडगे (रा. कुंभारगल्ली दौंड), राहुल विश्वनाथ कांबळे (रा. कुरकुंभ), अनिकेत अशोक चव्हाण (रा. भीमनगर सिद्धेटेकरोड दौंड), विलास केरबा तांदळे (रा.जुनी ग्रामपंचायत कुरकुंभ), अक्षय उर्फ रामचंद्र आनपंदा कांबळे (रा.रावणगाव ता. दौंड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत.
दौंड शहरात चालणाऱ्या जुगार अड्डयावरही कारवाई करून दौंड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आला आहे. रमेश जाधव (रा.गोवा गल्ली दौंड), मनोज साळवी (रा.इंदिरानगर दौंड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्याकडून १७६० रोकड, २५ हजार किमतीचा मोबाईल, एक पेन एक स्लिप बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस अंमलदार पांडुरंग थोरात, किरण पांढरे, अमीर शेख, अमोल देवकाते, सुभाष राऊत, विशाल जावळे, निखिल जाधव, आदेश राऊत, रवी काळे आदींनी केली आहे.