केडगाव : दौंड तालुक्यामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना 26000 हून अधिक मताधिक्य मिळाल्याने विद्यमान आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
दौंड या विधानसभा मतदारसंघाने सुप्रिया सुळे यांना मोठी साथ दिली. दरम्यान, या निवडणुकीमध्ये अजित पवार यांची भूमिका मतदारांना पटली नाही. तसेच कुल व थोरात यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर असताना देखील त्यांनी एकत्र येत तालुक्यातील बरेच पदाधिकारी यांनी महायुतीला साथ दिल्याने ती नाराजी मतदारांनी मतदानाच्या रूपाने व्यक्त केली. या परिस्थितीत आता एकीकडे सर्व पदाधिकारी व दुसरीकडे जनता यामुळे जवळ येत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीकडून विद्यमान आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यापैकी कोणाच्या नावाची वर्णी लागणार, तर तिकीट न मिळाल्याने कोण बंडखोरी करणार की शरद पवार यांच्या गटाला मिळणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आजी-माजी आमदार यांना देखील टेन्शन येऊ लागले आहे. तर सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणारे अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळणार अशा उलटसुलट चर्चा दौड तालुक्यात सुरू झाल्या आहेत.
त्यातच पुणे जिल्ह्यात केडगाव येथील सरपंचपदाच्या निवडणुकीने ओबीसी पॅटर्न चर्चेत आला आहे. याचा फायदा पुढील विधान सभेत बाळासाहेब कापरे यांना होईल काय? तसेच या पॅटर्नचा फायदा घेत बारामती लोकसभा निवडणुकीत महेश भागवत यांनी देखील 15000 हून अधिक मताधिक्य मिळवले आहे. आत्ता विधानसभेसाठी देखील त्यांचे नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे त्यांचेच सहकारी आनंद थोरात यांच्या देखील नावाची चर्चा असल्याने आता दौंड विधानसभेसाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.