अरुण भोई
Daund News : काळेवाडी : दौंड तालुक्यातील काळेवाडीमधील बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला केली आहे. या बंधाऱ्यातील पाण्यावर ग्रामस्थ पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी बंधाऱ्यामध्ये पाणी नाही
यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांना काळेवाडी बंधाऱ्यातील पाण्याची वाट पहावी लागत आहे. (Daund News) काळेवाडी या भागात दोन बंधारे आहेत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी बंधाऱ्यामध्ये आजही पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी बंधाऱ्यामध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
बंधाऱ्यात पाणी सोडल्यास आसपासच्या विहिरी, बोअरवेलमधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होईल. त्यामुळे पाण्याचा शेतकरी वर्गाला फायदा होईल. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मका, ऊस, बाजरी, कपाशी आदी पिके घेतली आहेत. (Daund News) पावसाने हुलकावणी दिल्याने या पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
याविषयी प्रतिक्रीया देताना हिंगणीबेर्डी काळेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश गायकवाड म्हणाले की, काळेवाडी, हिंगणीबेर्डी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहेत. सध्या पाण्याचा साठा शून्य टक्के आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची अतिशय गरज आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राजेगाव परिसरात आजही पाण्याची टंचाई; शेतकऱ्यांना प्रतीक्षा फक्त जोरदार पावसाची..!
Daund News : सोरतापवाडी येथील वाहन चालकाला पाटस टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण!