दौंड, (पुणे) : शाळा-महाविद्यालय परिसरात ओळखी-अनोळखी व्यक्तींकडून त्रास देणे, शाळेत येता-जाता प्रवासात रोडरोमिंयोंकडून छेडछाड करणे, हातवारे व इशारे करून त्रास देणे, पाठलाग करणे, शाळा महाविद्यालय परिसरात थांबून टूकारकी करणे असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ दौंड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दौंडचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. अशा रोडरोमियोंवर कडक कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला.
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळा-महाविद्यालयाच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांची दौंडच्या पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांना हे आवाहन यादव यांनी केले. तसेच सर्व शिक्षकांशी सविस्तर चर्चा करत अडचणी जाणून घेत सूचना केल्या. महिला, मुलींच्या, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.
यावेळी या बैठकीला संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड, श्री योग विद्यालय बेटवाडी, स्वर्गीय सुभाष कूल माध्यमिक विद्यालय काळेवाडी, मातोश्री पार्वती बाई शाळा दौंड, आलेश्वर विद्यालय आलेगाव, पासलकर माध्यमिक विद्यालय नानविज, सिद्धेश्वर विद्यालय देऊळगाव राजे, जिजामाता विद्यालय गोपाळवाडी, कै.भाऊसाहेब भागवत विद्यालय माळेवाडी, जनता माध्यमिक विद्यालय दौंड, लर्न अँड स्कूल गोपाळवाडी, आश्रम शाळा मोरे वस्ती लिंगाळी, श्रीमती वि. च. विद्यालय दौंड, जिल्हा परिषद शाळा जाधववाडी, उस्मान अली हायस्कूल भिमनगर दौंड, अगरवाल स्कूल सिद्धार्थ नगर दौंड, शेजो विद्यालय दौंड, राजेश्वर विद्यालय राजेगाव, श्रीराम विद्यालय स्वामी चिंचोली, जिल्हा परिषद शाळा लोणारवाडी, ग्यारेला विद्यालय दौंड, भैरवनाथ विद्यालय दौंड, भैरवनाथ विद्यालय वायरलेस फाटा गिरिम अशा एकूण २३ शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
यापुढे बोलताना यादव म्हणाले, “अशा अडचणीच्या काळात गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी टुकारकी करून त्रास देणाऱ्यांचे फोटो व्हिडिओ काढून तात्काळ पोलिसांना पाठवावेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहावे. महाविद्यालयीन युवतींनी कॉलेज परिसरामध्ये व घरापासून महाविद्यालयापर्यंत जाताना येताना कुणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर येऊन तक्रार करणे, शाळेमध्ये प्रत्येक महिन्याला पालक सभा घेऊन आपापसात चर्चा कराव्यात.”
दरम्यान, विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे फायदे-तोटे याबाबत शाळेमध्ये मार्गदर्शन करणे आदिबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थिनींना सुरक्षित व निर्भय ठेवण्यासाठी दौंड पोलीस कायम कार्यतत्पर असल्याचेही यादव यांनी सांगितले.