दौंड : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील नंदादेवी येथील १३ वर्षापासून बंद असलेला पाणंद रस्ता अखेर आज खुला करण्यात आला आहे. रावणगाव मंडल अधिकारी क्षेत्रात येणाऱ्या नंदादेवी गावाच्या हद्दीतील २०१२ पासून म्हणजे तब्बल तेरा वर्षापासून अडवलेला रस्ता आज प्रशासनाच्या वतीने खुला करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या नंदादेवी येथील शिव रस्ता २०१२ पासून ते आजतागायत शेतकऱ्यांच्या बांधाबाबतीत असलेल्या वादातून अडवण्यात आला होता.
आज अखेर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पाणंद रस्ते खुले करणे योजने’ अंतर्गत उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व तहसीलदार अरुण शेलार यांच्या पुढाकाराने यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार तुषार बोरकर, मंडळ अधिकारी महेंद्रसिंग भोई, ग्राम महसूल अधिकारी धनंजय डोंगरे, भूमी अभिलेखचे भुकर मापक राऊत तसेच पोलीस विभागाचे पोलिस उप निरीक्षक कुंभार यांच्या उपस्थितीत १३ वर्षांपासून बंद असलेला तब्बल १ कि.मी. लांबीचा शिव रस्ता खुला करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आजूबाजूच्या पंधरा ते वीस शेतकऱ्यांना ऊस व इतर शेत पिके वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण येत होती. परंतु, आता रस्ता खुला झाल्याने अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.