संदीप टूले
Daund News : केडगाव : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्यानंतर कांद्याचे बाजारभाव पडले, तेव्हापासून राज्यभर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दौंड तालुक्यातील कानगाव, गार, पडवी, माळवाडी येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आज बोंबाबोंब आंदोलन केले.
माळवाडी येथील शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढ केल्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन तत्काळ २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. (Daund News) मात्र, केंद्र सरकारने असे आमिष शेतकऱ्यांना दाखवू नये, शेतकऱ्यांना कांदा खरेदीची मलमपट्टी मान्य नाही. कांदा निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी दौंडच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या शेतकरी नैसर्गिक संकटामध्ये सापडले आहेत, त्यामुळे दुष्काळाचे सावट आहे. मागील शेतीमालाचे पैसे मिळाले नाहीत व पुढील पीके पावसाअभावी जळून जातील की काय, अशी भिती आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये हातात असलेला शेतमाल शेतकरी फुकट द्यायला तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. (Daund News) कानगाव येथे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करीत बोंबाबोंब आंदोलन केले. पडवी, गार, माळवाडी येथेही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.
याप्रसंगी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अनिल चव्हाण, कांदा उत्पादक महादेव चौधरी, महादेव निगडे, रामदास पवार, दादासाहेब गवळी, नानासाहेब गवळी, विठ्ठल गवळी, सदाशिव नलवडे, नामदेव निगडे, शंकर फडके, सुभाष फडके, दादासो बदरगे, कोर्हाळे, भाऊसाहेब फडके, विकास सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : खुटबाव येथे जनरीक मेडिकल सुरू करणार – माजी आमदार रमेश थोरात