केडगाव: दौंड तालुक्यात यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे महावितरणने आतापासूनच मान्सूनपूर्व कामांना गती दिली आहे. सध्या वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. वादळी वाऱ्याने प्रत्येकवर्षी होणारे नुकसान आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजनांवर विशेष भर दिला जात आहे.
पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यात प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढवणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश असतो. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात या कामांना गती दिली जाते. मात्र, यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा फटका आणि होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणने मान्सूनपूर्व कामांमध्ये लक्ष घातले आहे.
काही दिवसांपासून भर उन्हात महावितरण कर्मचाऱ्यांकडून विविध ठिकाणी हे काम सध्या गतीने सुरू आहे. याशिवाय रस्त्यावरील तारांवर सुरक्षा कवच लावणे आदी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली जात आहेत. त्यांनतर येत्या पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित राहू नये, यासाठी ”महावितरण”च्या कर्मचाऱ्यांनी कामात पूर्णपणे झोकून दिले आहे.
दौंड व शिरूर तालुक्यातील 210 गावांमध्ये तब्बल 100 हजार हेक्टर शेत्रावर शेती केली जाते. त्यासाठी 15 हजार ट्रान्सफॉर्मर आहेत. या ट्रान्सफॉर्मर कार्यक्षेत्र असलेल्या परिसरात मान्सून पूर्व काळात वादळी वारे आणि पावसामुळे वारवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून वीजपुरवठा संदर्भातील कामे सुरू केली आहेत .
-सुनील दरवडे – कार्यकारी अभियंता केडगाव (महवितरण)
शेतकऱ्यांकडे वेळीच लक्ष देण्याच्या दृषटीकोनातून सध्या आम्ही सर्व वीजग्राहकांची काळजी घेत कामे सुरू केली आहे. वादळी वारा, अतिवृष्टीत वीज पुरवठा खंडित होण्याची भीती सर्वाधिक कृषीपंपाना सहन करावी लागते .याचा परिणाम पिकांवर परिणाम होतो. त्यामुळे कृषी पंप वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यासाठी वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा ओढणे अशी कामे तत्काळ केली जात आहेत.
-पप्पू पिसाळ – शाखा अभियंता पिंपळगांव विभाग