संदीप टुले
Daund News : पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या केडगाव ग्रामपंचायत भोंगळ कारभार अजून एका कारणाने उघड झाला. केडगाव ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा लाईन गेली चार दिवस फुटली होती. त्यामुळे स्टेशन वार्ड क्र.५ चा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. याची नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ व शिवाजी गरदडे यांच्याकडे विचारणा केली.
सदस्यांनी तेव्हा ग्रामपंचायतकडे विचारणा केली असता त्यांना ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये पैसे नाही व पाणी पुरवठा लाईन दुरस्तीसाठी लागणारे साहित्यही कोणताच दुकानदार उधारीवर ग्रामपंचायतीला देत नाही, असे उत्तर मिळाले.
गेली तीन दिवस हा खेळ चालू होता. शेवटी ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ व शिवाजी गरदडे यांनी ग्रामपंचायतीला २५ हजार रुपये उसने पैसे दिले. तेव्हा कुठे साहित्य विकत घेऊन पाण्याची लाईन दुरुस्त झाली. यावरून या बहुचर्चित केडगाव ग्रामपंचायतमध्ये किती भोंगळ कारभार चालू आहे हे उघड झालं आहे.
यामध्ये प्राथमिक माहितीमध्ये असे समजले की, केडगाव ग्रामपंचायतचा ७५ टक्के महसूल या स्टेशन वार्ड क्र ५ मधून जमा होतो. येथील नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी ३ ते ४ दिवस वाट पाहावी लागली आहे.
तसेच ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे ५ पगार ही थकले असून, या कर्मचाऱ्याचा पगार देण्यासाठीही ग्रामपंचायतकडे पैसे नाहीत, असे एका ग्रामपंचायत सदस्याने सांगितले. या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
15 वा वित्त आयोगाचा आराखडा मंजूर पण…
15 वा वित्त आयोगाचा आराखडा मंजूर आहे. पण त्याची प्रत पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीकडे मिळाली नसल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे.
– अजितकुमार शेलार, सरपंच, केडगाव
केडगाव ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू
केडगाव ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार चालू असून, मागील काही दिवसापूर्वी ओढा खोलिकरणाचे बोगस बिल काही लोकांनी संगनमताने काढले असून, केडगाव ग्रामपंचायत ही सरपंच चालवत नसून त्यांच्या अडून काही गाव पुढारी चालवत आहे.
– दिलीप हंडाळ, ग्रामपंचायत सदस्य, केडगाव
पाणीपट्टी १५ टक्केही वसुली नाही
केडगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व वार्डची पाणीपट्टी १५ टक्के पण वसुली नाही व पाण्यावर होणारा खर्च हा जास्त प्रमाणात असल्यामुळे खात्यावर पैसेच शिल्लक नाहीत.
– ज्ञानोबा काळे, ग्रामसेवक, केडगाव ग्रामपंचायत
ग्रामपंचायत सांगते आमच्याकडे पैसे नाही
आमच्या वार्ड क्र.५ ची सर्वाधिक ७० टक्के पाणीपट्टी वसुली आहे. पण प्रत्येकवेळी आमच्या वार्डचे काही काम निघाले की ग्रामपंचायत सांगते आमच्याकडे पैसे नाही.
– नितीन कुतवळ, ग्रामपंचायत सदस्य