संदीप टूले
Daund News : दौंड : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात राजेगाव फार्म, खानवटे, स्वामी-चिंचवली, मलठण, नायगाव या ठिकाणी रात्रीच्या वेळी अवैधपणे बेसुमार माती उत्खनन जोरात चालू आहे. यावर प्रशासनाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे उजनीचे अधिकारी व महसूलचे अधिकारी मालामाल झालेले पाहायला मिळत आहेत.
दौंड तालुक्यातील या ठिकाणी हजारो ब्रास माती उत्खनन झालेले पाहायला मिळत आहे. तसेच या बेकायदेशीर उत्खननामुळे भीमानदीचा मुख्य प्रवाह बदलून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Daund News) तसेच शेजारील भिगवण-राशीन रोडवरील एसटी पुलास देखील धोका होऊ शकतो. नदीपात्रात खोलवर उत्खनन झाल्याने पुराचे पाणी लगतच्या घरांमध्ये जाऊ शकते. तरीही संबंधित अधिकारी कारवाई का करत नाहीत? हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
शेतकरी दिसले की लगेच कारवाई
दुसरीकडे, शेतकरी कधीतरी काळी माती वाहतूक करून स्वतःच्या शेतात टाकताना दिसले तरी अधिकारी येऊन लगेचच बंद करतात. (Daund News) इकडे मात्र विटभट्टीची अवैध माती रात्रभर उत्खनन करून लाखो रुपयाला विक्री करून रात्रीत लखपती होत आहेत. त्याकडे मात्र अधिकारी जाणून-बुजून दुर्लक्ष का करत आहेत? हे न सुटणारे कोडे आहे.
चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल : मंडल अधिकारी
याबाबत रावणगाव मंडल अधिकारी भोई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गावकामगार तलाठी दीपक आजबे यांना पंचनामा करून योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. (Daund News) उजनीचे अधिकारी खाडे यांनीही चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले.