Daund News : केडगाव : बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या घटनांमुळे भीती तर वाढत आहेच, पण वारंवार घडून येणारा बिबट्याविरुद्ध मानव हा संघर्ष चिंताजनक असल्याची बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. नानगाव (ता. दौंड ) येथे शेतमजुरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे. काशिनाथ बापू निंबाळकर (वय ५२, रा. नानगाव) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. काळ आला होता; पण वेळ आली नव्हती, अशी ही घटना आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा बिबट्या विरुद्ध मानव या संघर्षाची चर्चा होत आहे.
काळ आला होता; पण वेळ आली नव्हती
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले निंबाळकर यांचे गाव भीमा नदीकाठी वसले आहे. निंबाळकर यांच्या घराभोवती ऊस आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निंबाळकर नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर आले. त्याचवेळी घराशेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्यांच्यावर झडप घेतली. रात्रीच्या वेळी झोपेत असताना अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे निंबाळकर यांची भितीने गाळण उडाली. बिबट्याने त्यांचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी झालेल्या झटापटीत बिबट्याच्या तोंडी निंबाळकर यांची हनुवटी आली. हल्ला होताच निंबाळकर यांनी आरडाओरड केली. (Daund News) ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांची पत्नी सरूबाई (वय ४५) व त्यांच्या कुत्र्याने घरामागे धाव घेतली. या वेळी निंबाळकर बिबट्याचा जोरदार प्रतिकार करत होते. समोरचे दृश्य पाहून घाबरलेल्या सरूबाईंनी लाकडाच्या ओंडक्याने बिबट्यावर हल्ला चढवला. त्याचवेळी सोबत असलेल्या कुत्र्याने देखील बिबट्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गांगरलेल्या बिबट्याने काशिनाथ यांना सोडत उसात धूम ठोकली.
बिबट्याच्या जिवघेण्या हल्ल्यात निंबाळकर यांच्या हनुवटीला सहा टाके पडले असून, हाता-पायांना बिबट्याची नखं लागल्याने ओरबाडले गेले आहे. बिबट्याने निंबाळकर यांच्या हनुवटीचा घाव घेतल्याने एक दात देखील तुटला आहे. दरम्यान, या हल्ल्यानेतर निंबाळकर यांना तातडीने पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. (Daund News) लस दिल्यानंतर केडगाव येथील वरद विनायक रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निंबाळकर यांची प्रकृती सुधारत असल्याचे डाॅ. सचिन भांडवलकर यांनी सांगितले.
बिबट्याचा हल्ला डोळ्यांसमोर पाहिलेल्या निंबाळकर यांच्या पत्नी सरूबाई म्हणाल्या की, रात्रीच्या वेळी अचानक घराबाहेर ओरडल्याचा आवाज आल्याने मला जाग आली. बाहेर येऊन पाहते, तर धक्कादायक दृश्य दिसले. क्षणभर काहीच सुचले नाही. अखेर जीव एकवटून हातात आलेल्या लाकडाच्या ओंडक्याने बिबट्यावर हल्ला केला आणि त्याला पळवून लावले. (Daund News) आमच्या कुत्र्याने देखील बिबट्याला सोडले नाही. तर बायकोमुळेच आज तुमच्यासमोर जिवंत दिसत आहे, असे सांगत निंबाळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, निंबाळकर हे नानगावचे माजी उपसरपंच संदीप खळदकर यांच्या शेतात काम करतात. नदीकाठचा परिसर बिबट्याचे आश्रयस्थान बनल्याचे खळदकर यांनी सांगितले. वन खात्याने पिंजरा लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी खळदकर यांनी केली आहे.
बिबट्या वयाने लहान असल्याने सुदैवाने निंबाळकर यांची सुटका झाली आहे. घटनेचा पंचनामा केला असून लवकरच आर्थिक मदत केली जाईल. (Daund News) ग्रामपंचायतीचा ठराव आल्यानंतर पिंजरा मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनअधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : मलठण येथील रोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Daund News : राजेगाव परीसरात बिबट्याची दहशत ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Daund News : …अद्यापही काही शेतकरी पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत