गणेश सुळ
Daund News : केडगाव, (पुणे) : दहावी व बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्यासाठी विविध दाखले ऑनलाइन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच ‘आपले सरकार-महाऑनलाइन’ या सरकारी संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली. (Daund News)
महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी आरक्षित कोट्याअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पनाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु, सध्या सदर सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणाऱ्या ‘आपले सरकार-महाऑनलाइन’ हे संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास संबंधित महाविद्यालयीन प्रवेशाची संधी हुकते का? अशी चिंता विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. (Daund News)
या पार्श्वभूमीवर विविध शासकीय अधिकारी तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री दीपक केसकर, सचिव शालेय शिक्षण विभाग यांना पत्र देऊन या प्रवेशासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र विद्यार्थी सादर न करू शकल्यास अर्जाची पोच पावती व हमीपत्र भरून घेऊन प्रवेश देण्यात यावा, व प्रमाणपत्र सादर करण्यास 3 महिने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली आहे. (Daund News)
संकेतस्थळाचे सर्व्हर संथगतीने सुरु
‘आपले सरकार-महाऑनलाइन’ या सरकारी संकेतस्थळाचे सर्व्हर अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे विविध प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वेळ लागत आहे. वेळेत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास विद्यार्थ्यांची संबंधित महाविद्यालयात प्रवेशाची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Daund News)
प्रमाणपत्रांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेवर ताण
विविध प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी ‘महाऑनलाइन’ या संकेतस्थळावर दररोज लाखो अर्ज येत असतात. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे तात्काळ हवी असतात. त्यामुळे एकाचवेळी विद्यार्थ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. कमी वेळेत असंख्य विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे उपलब्ध करून देताना यंत्रणेवर ताण येतो. विद्यार्थ्यांच्या तात्काळ मागणीमुळे काही प्रमाणात तांत्रिक गोंधळ निर्माण झाला आहे. हा तांत्रिक गोंधळ सोडविण्यासाठी आमचे पथक काम करत असल्याचे ‘महाऑनलाइन’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. (Daund News)