गणेश सुळ
Daund News केडगाव : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सोसायटी गटाच्या उमेदवारांची फेर मतमोजणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दौंड सहकार सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना नुकतेच दिले होते. (Daund News) त्यानुसार रविवारी (दि.25) दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फेर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये भाजपच्याच दोन्ही उमेदवाराचा विजय झाला आहे. (Daund News)
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोसायटी गटातून पराभूत झालेले माजी आमदार रमेश थोरात गटाचे उमेदवार कल्याण पवार, संतोष वरघडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने फेर मतमोजणी आदेशाच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध कार्यकारी सोसायटी या सर्वसाधारण मतदारसंघासाठी 27 जून 2023 च्या आत फेर मतमोजणी करण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात गटाच्या उमेदवारात अटीतटीची लढाई झाली होती. या निवडणुकीत दोन्ही गटाचे नऊ-नऊ समान उमेदवार विजयी झाले होते.
दरम्यान, माजी आमदार रमेश थोरात गटाच्या एका विजयी उमेदवाराचे निधन झाले. त्यामुळे आमदार कुल गटाकडे नऊ तर माजी आमदार गटाकडे आठ सदस्य संख्या होती. त्यामुळे आमदार राहुल कुल गटाकडे दौंड बाजार समितीची सत्ता आली.
एकंदरीतच सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातील अकरा जागांपैकी सात जागा थोरात गटाला तर चार जागा कुल गटाला मिळाल्या होत्या. वरघडे एका मताने तर पवार हे तीन मतांनी पराभूत
थोरात गटातील संतोष वरघडे हे एका मताने तर कल्याणराव पवार हे तीन मतांनी पराभूत झाले होते. परिणामी, संतोष वरघडे आणि कल्याण पवार यांनी मुंबई उच्च न्यायालय फेर मतमोजणीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन संबंधित निर्णय देण्यात आला होता. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित तावरे म्हणाले की, कायद्याच्या बाबी तपासून योग्य ते कामकाज केले जाईल.
दोन जागांसाठी फेर मतमोजणी
मुंबई उच्च न्यायालयाने मतमोजणीचे आदेश दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी हर्शित तावरे यांच्या नियोजनाने आज पुन्हा या दोन जागांसाठी फेर मतमोजणी झाली. यामध्ये आमदार कुल गटाचेच दोन्ही उमेदवार निवडून आले.