राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय सुरु करण्याबाबतचा निर्णय आज शासनाने जाहीर केला. दौंड तालुक्यातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून, आता दौंड येथे स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
दौंड येथे प्रांत कार्यालय व्हावे, यासाठी आमदार राहुल कुल हे मागील अनेक वर्षे आग्रही होते. त्यांच्या मागणीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली होती.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रक्रियेला गती देण्यास मोलाची मदत केली. आज सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला, याचा आनंद होत असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.
दरम्यान, दौंड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल दौंड तालुक्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुती सरकारचे आमदार कुल यांनी आभार मानले.