पुणे : पुण्यात एका 54 वर्षाच्या व्यक्तीने मुलीच्या शरीराला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केला. याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या आईला बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेला मदत करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला देखील मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार सातारा रोडवरील आदिनाथ कॉम्प्लेक्स येथील झेरॉक्स सेंटर येथे रविवारी 17 मार्चला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन किशोर बाळकृष्ण शाळीग्राम (वय-54 रा. केशव कृपा, शिवदर्शन, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे सातारा रोडवरील आदिनाथ कॉम्प्लेक्स येथे कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी दुचाकीवरुन जात होते. आरोपीने एका मुलीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीच्या आईने आरोपीला जाब विचारला असता त्याने महिलेला मारहाण केली.
त्यावेळी फिर्यादी हे महिलेच्या मदतीसाठी गेले. फिर्यादी यांनी आरोपीला पकडून ठेवले असता त्याने फिर्यादी यांच्या तोंडावर मारहाण करुन पळून गेला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.