भिगवन : स्वामी चिंचोली ता. दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंजिनीअरिंग महाविद्यालयातील प्रा. भाऊसाहेब अनारसे यांना सनराईज युनिव्हर्सिटी अलवार व प्रा. कमलकिशोर शर्मा यांना जे.जे.टी.यु. राजस्थान या विद्यापीठाकडून अभियांत्रिकी शाखातील सर्वोच्च पदवी पीएचडी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यासाठी प्रा. अनारसे यांना डॉ. राम मोहन सिंग भदोरिया व प्रा. शर्मा यांना डॉ. शिवकुमार राममूर्ती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. अनारसे यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये “क्रिटिकल स्टडी ऑफ होल्टेज मॅनेजमेंट वर्क युजिंग ऑप्टिमाइज्ड इलेक्ट्रिकल पावरफ्लो इन्वेस्टीगेशन” या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. तसेच याच विषयावर त्यांचे दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत.
प्रा. शर्मा यांनी सिविल इंजिनिअरिंग मध्ये “संरचना आरोग्य सुधारण्यासाठी मल्टीवॉल कार्बन नॅनो ट्यूब ची अंमलबजावणी” या विषयावर शोध निबंध सादर केला होता.
याविषयी बोलत असताना डॉ. अनारसे यांनी पीएचडी केल्यामुळे अनुभवाला एक झळाळी मिळाल्याचे सांगितले. तसेच आपल्या या अनुभवाचा आपण इतरांना फायदा करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉ. शर्मा यांनी पीएचडी दरम्यान खूप अडचणी आल्या परंतु संस्थेने केलेला मदतीमुळे व आत्मविश्वासास दिलेल्या बळामुळे ही पदवी प्राप्त केल्याचे सांगितले. दोघांनीही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष मा. राणादादा सुर्यवंशी व सचिव मा. माया झोळ यांनी केलेल्या सहकार्य, विश्वास व मदतीबद्दल आभार मानले.
यानिमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यास मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दोघांनीही केलेल्या संशोधनाचा देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकास करण्याला तसेच उद्याच्या होऊ घातलेल्या हजारो अभियंत्यांना नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन केले. तसेच यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर प्राध्यापकांनीही आपापल्या विषयातील सर्वोच्च पदवी घ्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. शरद कर्णे, प्राचार्य डॉ. आप्पासो केस्ते, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत साळुंके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.