पुणे : लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन पैसे कमवणाऱ्या विविध टोळ्या देशभर सक्रिय आहेत. त्यांच्यामार्फत देशभरातील लोकांना बनावट कॉल करुन, मेसेज करुन त्यांची फसवणूक केली जाते. काहीवेळा बनावट ऑनलाईन शॉपिंग साईट्स बनवून लोकांचे पैसे लुटले जातात. अशाच एका ऑनलाइन डेटिंग ॲपवरुन एका तरुणाशी झालेली ओळख तरुणीला महागत पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून या तरुणीची तब्बल २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तरुणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने मंगळवारी (ता. ३०) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून हरशीत कुमार राय (वय २८, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२३ ते आजपर्य़ंत फिर्यादी महिलेच्या घरी घडला.
ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार सध्या समोर येत आहेत. या टोळ्या अगदी सहजपणे लोकांना विळख्यात अडकवतात. ओटीपीची मागणी करुन, बँक डिटेल्स मागून खात्यातले सर्व पैसे गायब करण्याचे काम या लुटारु टोळ्या करत असतात. याबाबत पोलीस सतत सतर्क राहण्याचे आवाहन करत असतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणीची ओळख हॅपन या ऑनलाईन डेटींग अॅपवर झाली. यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. आरोपीने तरुणीच्या राहत्या घरी येऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच हरशीत राय याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून २७ लाख रुपये घेतले.
दरम्यान, आरोपीने गोड बोलून विश्वास संपादन केला. यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्न करण्यास नकार दिला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन हरशीत राय याच्याविरोधात तक्रार दिली.