विजय लोखंडे
वाघोली: नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाश चिन्ह विभागाच्या पथकाने पुणे-नगर महामार्गासह परिसरातील सात धोकादायक होर्डिंग्स क्रेनच्या सहाय्याने जमीनदोस्त केले. धोकादायक होर्डिंगवर मनपा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून उपायुक्त किशोर शिंदे व नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतील धोकादायक होर्डिंगवर गुरुवारी (३० मे) पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे. आव्हाळवाडी फाटा येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक होर्डिंगसह अन्य ठिकाणचे सात होर्डिंग आकाश चिन्ह विभागाचे मुख्य निरीक्षक गणेश भारती यांच्या पथकाने क्रेनच्या सहाय्याने जमीनदोस्त केले.
दरम्यान होर्डिंवर कारवाई सुरु असतानाच वाघोली येथील एका स्थानिकाने वाघोली-केसनंद या राज्य मार्गावरील ईपिक सोसायटीजवळ वर्दळीच्या ठिकाणी असलेले धोकादायक होर्डिंग काढण्यात यावे, अशी लेखी तक्रार दिली. त्यामुळे या होर्डिंगवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे. वाघोली, पुणे-नगर महामार्गासह परिसरातील धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आकाश चिन्ह विभागाचे मुख्य निरीक्षक गणेश भारती यांनी सांगितले.
मनपा प्रशासनाने धोकादायक होर्डिंग्सवर केलेली कारवाई स्वागतार्ह आहे. परंतु, शहरात मोठ्या प्रमाणावर होर्डिंग उभारण्यात आले असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने वेळीच गांभीर्याने लक्ष देवून होर्डिंगसह परवान्याची तपासणी करून अनधिकृत, धोकादायक, गर्दीच्या ठिकाणचे आणि रस्त्यालगत असणारे होर्डिंग काढण्यात यावे.
-प्रकाश जमधडे, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली