पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून नृत्यांगणा गौतमी पाटीलचे कार्यक्रम सातत्याने चर्चेत असतात. गौतमी पाटीलला आता मायभूमीतून बळ मिळाले आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्टकरुन माहिती दिली आहे.
गौतमी पाटीलने केलेल्या पोस्टमध्ये “माजी मंत्री तथा आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश!” असे म्हटले आहे.
दरम्यान, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या घटनांची देखील अनकेदा चर्चा होत असते. गौतमी पाटील तिच्या नृत्याच्या शैलीमुळे वादात अडकली होती. त्या वादानंतर तिने माफी मागून असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याचे देखील म्हटले होते.