पुणे : पुण्यातील कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नृत्य शिक्षकाच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. आरोपीने आणखी काही बालकांवर अत्याचार केले आहेत का? याचा तपास केला जात असून, शाळेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहेत, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे.
या प्रकरणी ३९ वर्षीय नृत्य शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलमांनुसार दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीने बालकांवर अत्याचार करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून, ते त्याच्या मोबाइलमध्ये आढळून आले आहे. आरोपीने आणखी किती पीडित बालकांवर अत्याचार केले आहेत, त्याला गुन्हा करण्यासाठी कोणी मदत केली, आदी बाबींचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली आहे.