पुणे : शहरात दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका नामवंत शाळेतील डान्स शिक्षकाने 11 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुणे शहरातील कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी शिक्षकाला तात्काळ अटक केली आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरु असताना हा सर्व प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंगेश साळवे असे डान्स शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डान्स शिकवणा-या शिक्षकाने हे संतापजनक कृत्य केल्याचे 11 वर्षाच्या विद्यार्थ्याने समुपदेशन सुरु असताना सांगितला. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.
या अकरा वर्षांच्या विद्यार्थ्याने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना देखील सांगितला नाही. या घटनेची माहिती कळताच त्याच्या आई-वडिलांना देखील मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ वारजे पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंगेश साळवे या डान्स शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याला अटक केली आहे.
पोलिसांकडून सध्या आरोपी शिक्षक मंगेश साळवेची चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुद्धा या शिक्षकाने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.